🔹असा हवा... नवा महाराष्ट्र !🔹
अथांगसागरापरी सर्वदूर ख्याती,
असा आमुचा विशाल महाराष्ट्र |
अवकाशापरी डोळ्यात साठवावा,
असा आमुचा नयनरम्य महाराष्ट्र |
सकल संतांची भूमी, छत्रपती शिवरायांची भूमी, कलावंतांची भूमी, नेत्यांची भूमी, आणि आसमंत दुमदुमणारी आमुच्या धगधगत्या महाराष्ट्राची ही सुजलाम सुफलाम भुमी. या राष्ट्राची सध्यस्थितीची सामाजिक, सास्कृतिक, ऐतिहासिक व राजकीय वाटचाल पाहाता पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांवर याचा प्रभाव राहील हे त्रिकालबाधीत सत्य आहे.
१ मे १९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर अनेक लोकनेत्यानी या महाराष्ट्रासाठी बहुमूल्य असे योगदान दिले आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाण यांंपासुन ते आताचे मुख्यमंत्री श्रीमान. उद्धवजी ठाकरे यांचे नाव आवर्जून उल्लेखले जाईल. हा महाराष्ट्र एकुण पाच विभागात विभागलेला दिसून येतो, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण यांचा समावेश होतो. प्रत्येक विभागाचा विचार केल्यास तिथल्या सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक आणि भाषिक पद्धतीत थोडाफार का होईना बदल असलेला पहायला मिळतो. या महाराष्ट्राची 'आर्थिक' राजधानी मुंबई हि संपूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीचे केंद्रस्थान मानलं जाते. कारण ते राजकीय ध्येयधोरणांचे देखील केंद्रस्थान आहे. म्हणून सर्वप्रथम या राष्ट्राला कवी गोविंदाग्रज यांच्या ओळीतून प्रणाम.
मंगलदेशा, पवित्रदेशा महाराष्ट्र देशा |
प्रमाण घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा |
भारत देश जसा विकसनशीलतेकडे वाटचाल करतोय त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुद्धा त्याचा अविभाज्य घटक म्हणून विकसनशील झालेला दिसून येतो, पण इथल्या अनेक अडचणींना सामोरे जाताना त्याचा होणारा विकास हा कुठेतरी खुंटल्याची भावना मनात निर्माण होते. याला कारणीभूत जशी काही नैसर्गिक कारणे आहेत त्याचप्रमाणे काही मानवनिर्मित कारणे सुद्धा आहेत. इथला पाचवी ला पुजलेला दुष्काळ, न संपणारा शेतकरी आत्महत्या चा प्रश्न आणि फोफावलेला भ्रष्टाचार प्रखरपणे दिसून येतो. खेड्यापाड्यात राहणारे बहुसंख्य लोक, आदिवासी भागात राहणारे बांधव किंवा दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणारा समाजघटक यांच्यापर्यंत अजूनही भौतिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत याची खंत मनात थैमान घालते. राष्ट्राला मारक असणाऱ्या या गोष्टिंबरोबरच इथला जातीवाद, आणि धार्मिक वाद हा अप्रत्यक्षपणे इथल्या विकासावर खुंटण आणतोय याची जाणीव होते. आणि आज जे काही प्रश्न देशाला आणि इथल्या समाजघटकांना भेडसावत आहेत ते प्रश्न इथे राहणाऱ्या प्रत्येकाचे आहेत आणि त्याचा नायनाट झाला तर हे राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ नाही लागणार.
या राष्ट्राला समृद्ध आणि उच्चतम अशा शिखरावर घेऊन जायचं असेल तर इथल्या मागासलेल्या व्यवस्थेवर घाव घालणं गरजेचे आहे. या राज्याच्या सामाजिक, भौतिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा प्रत्येक मुद्द्याला अनुसरून आणि प्रत्येक मुद्दा विचारात घेऊन योग्य तो बदल करायला हवाय. समाजात निर्माण झालेली जातीय तेढ, बिघडत चाललेला सामाजिक सलोखा, अगदी खालच्या पातळीवर असलेलं जातीय राजकारण याचा नायनाट हा करावाच लागेल. आज महाराष्ट्राच्या भौगोलिक घटकांचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असलेली अनुभवयास मिळते. तीथले राहणीमान असेल किंवा तिथली भौगोलिक परिस्थिती असेल या सगळ्याचा आढावा घेऊन एकुणच परिस्थिती ला पुरक अशी रचना तयार करावी लागेल. मग शेती पद्धत असो किंवा उदयास येणारे छोटेमोठे उद्योग असो किंवा अन्य उपक्रम असो हे त्या वातावरणात तग धरणारे असायला हवे. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन तिथल्या सांस्कृतिक घटकात आढळणारी विविधता, भाषिक बदल व राहणीमानात असणारा फरक लक्षात घेऊन त्या सांस्कृतिक घटकांचा दर्जा कसा वाढवता येईल यासाठी ठोस पावले उचलायला हवी. कोकण विभागाला लाभलेली सागरी किनारपट्टी जशी सांस्कृतिक दृष्टीने लाभदायक आहे तशीच राज्याच्या दुष्काळग्रस्त असाणाऱ्या विभागाचा विचार केल्यास त्यावर उपाययोजना व्हायला हव्यात.
शासन स्तरावर काम करणारी यंत्रणा ज्या प्रमाणे कार्यतत्पर असेल त्याचप्रमाणे ती यंत्रणा प्रशासन यंत्रणेला चालणा देणारी असावी प्रशासन यंत्रणेला कार्यतत्पर करणारी असावी. राज्याच्या ग्रामपंचायत ते विधानसभे पर्यंत काम करणारी प्रशासन यंत्रणा आहे जी खेडोपाडी, गावोगावी तालुकास्तरावर आणि जिल्हास्तरावर काम करणारी असेल ती तेवढीच सक्षम असायला हवी. राज्याची राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय यंत्रणा ही भ्रष्टाचार मुक्त असायला हवी तर आणि तरच प्रत्येकाच्या मनात असणारा बलशाली, सर्वगुणसंपन्न आणि विकसित महाराष्ट्र इथल्या प्रत्येक मानवी घटकाला पहायला वेळ लागणार नाही.
राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी ज्या काही गोष्टी तारक आहेत त्यांंचे संवर्धन करणे आणि ज्या काही गोष्टी मारक आहेत त्यांचा नायनाट करणे हे धोरण राष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी नक्कीच नवी दिशा देणारे असेल. एकुणच महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख पहाता थोडाफार का होईना तो उंचावलेला दिसतो कधीकीतो समतोल असलेलेला दिसतो पण खालावलेला दिसत नाही याचा अर्थ राज्य प्रगतीपथावर आहे. जरी राज्य प्रगतीपथावर असले तरी या राज्याच्या समस्या काही केल्या लपुन रहात नाहीत. त्या सामाजिक, आर्थिक, भौतिक, भौगोलिक आणि राजकीय समस्या यांचा तपशीलवार अभ्यास करुन त्यावर उपाययोजना करुन या समस्या कायमस्वरूपी संपुष्टात आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक अस्मितेला लागलेली जातीय किड ही सर्वात प्रथम ठेचून काढायला हवी. या राज्याच्या सर्वांगीण विकासात अडथळा आणणारी गोष्ट कोणतीअसेल तर ती म्हणजे व्यक्तीच्या मनामनात ठाण मांडून राहीलेली 'जात'. आज राज्यातील वेगवेगळ्या स्तरातून काढण्यात आलेले जातीय मोर्चे, ओबीसी मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 'भिमा कोरेगाव' सारखे सलोखा बिघडवणारे आणि राज्यात अस्थिरता पसरवणारे जातीय दंगली सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढतात. या सर्व गोष्टिंवर अंकुश ठेवण्यासाठी व अशा प्रकारच्या गोष्टी थांबवण्यासाठी वेळीच पाऊले उचलणे आवश्यक नाहीतर उद्या याचा भविष्यात वाईट परिणाम बघायला मिळेल. महाराष्ट्रातील जातीवाद संपुष्टात आला तर या राज्याची प्रगती कोणीही रोखु शकत नाही. यासाठी सरकारने आंतरजातीय विवाहासाठी चालना देणारे उपक्रम राबवायला हवेत. इथली जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
या राज्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, प्रत्येकाचे राहणीमान व संस्कृती या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते, अशावेळी इथली संस्कृती आणि समता टिकवून ठेवणे तितकेच जिकरीचे वाटते पण तरीही कित्येक पिढ्या या मातीत मिसळून गेल्या पण सलोखा जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला गेला. या सलोख्याचे शाहीर अमर शेख यांनी अगदी मोजक्या शब्दात अचुक असं वर्णन केले आहे.
'स्वातंत्र्य शांतता स्थापू । अवघे जग त्याने व्यापू
फडकवू ध्वज समानतेचा। पर्वा न जीवाची करता
संयुक्त महाराष्ट्र दाखवू । विभवा प्रत चढताना'
या राज्याच्या विभाजनासाठी याच राज्यात वेगवेगळ्या चळवळी देखील नावारूपास आली यात स्वतंत्र विदर्भ चळवळ मोठ्या प्रमाणात गाजली पण आजही या अखंड आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक शिलेदार आपल्या रक्ताचे पाणी करत असलेले दिसून येते. त्यामुळे या महाराष्ट्राच्या अखंडतेला कधीही धोका पोहोचणार नाही हेही तितकेच खरे आहे. आज राष्ट्राला खरी गरज आहे ती म्हणजे शैक्षणिक क्रांतीची. 'आधुनिक युगात, आणि तंत्रज्ञानाच्या जगात' जगत असताना जागतिक दर्जाचे आणि जागतिक पातळीवर ठसा उमटवणारे शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. पत ते सामान्य माणसाला परवडेल व आर्थिक बाबींना सामोरे जाता येईल असं असावे. आज कित्येक विद्यार्थी आर्थिक अभावामुळे ज्ञान असुनही उच्चतम शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून ते प्रत्येकाला घेता येईल अशा कमी खर्चिक स्वरुपाचे असावे. या सगळ्या गोष्टी विचारात घेता प्रत्येक व्यक्ती ला योग्य दर्जाचे जीवनमान जगता येईल व मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आर्थिक दरी कमी होईल हे निश्चित. आज दिल्ली सारख्या ठिकाणी ज्या प्रकारच्या शाळा उभारल्या आहेत त्याची 'कॉपी' आपल्या महाराष्ट्रात देखील व्हायला हवी. आणि शैक्षणिक क्रांती ची हिच उत्तम प्रकारची सुरुवात असेल असे म्हणायला काही हरकत नाही. सर्वात मोफत आणि उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा, उच्चशिक्षण देणारी महाविद्यालये आणि या राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावणाऱ्या उद्योगधंद्यांना चालना देणारी उत्तम दर्जाची तांत्रिक महाविद्यालये निर्माण करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीचा विचार करता, महाराष्ट्रातील शहरी भागातील उद्योगधंदे हेच आर्थिक स्त्रोतांचे उगमस्थान मानले जाते. मुंबई ,पुणे सारख्या शहरात खेड्यातील व्यक्ती पोटापाण्यासाठी व आर्थिक मिळकतीसाठी एकवटलेला पहायला मिळतो. आज महाराष्ट्रातील सर्वांगीण बाजुंनी विचार केल्यास इथे आर्थिक तफावत मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. इथल्या मुठभर लोकांच्या हातात संपत्ती एकवटलेली दिसते तर बरेच लोक दोनवेळ च्या जेवणासाठी संघर्ष करत असलेले पहायला मिळतात. ही आर्थिक दरी संपवायची असेल तर प्रत्येकाला शिक्षण आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळणं गरजेचे आहे. यासाठी शेतीपूरक व्यवसाय असतील किंवा छोटेमोठे उद्योगधंदे असतील यांना चालना देऊन त्यातुन उद्योजक तयार करावे लागतील. आज महाराष्ट्रातील शेतीची अवस्था काय वेगळी वर्णन करुन सांगावी लागत नाही. इथला शेतकरी या आधुनिक एकवीसाव्या शतकात आत्महत्या करतोय यासारखे दुर्दैव कोणतेच नाही. इथला शेतकरी ज्याला आपण 'जगाचा पोशिंदा' म्हणतो हा पोशिंदा ताठ मानेने जगायला हवाय. शेतीतून मिळणारे उत्पन्न असो कि शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन असो हा नकारात्मक असलेला दिसतो. राज्यातील तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे आणि त्यासाठी लागणारी जी काही सक्षम साधने आहेत आधुनिक शेती पद्धत आहे ही ही उत्तम रीत्या राबवली गेली पाहिजे. शेतीसाठी लागणारी आधुनिक अवजारे असतील किंवा आधुनिक बी,बीयाणे असतील याचा पुरेपुर उपयोग इथल्या शेतकऱ्याने केला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना प्रलोभने दिली पाहीजेत. आणि इतर उद्योगधंद्या प्रमाणेच शेती हा सुद्धा एक उद्योग आहे हे आमच्या तरुणांच्या मनात बिंबवले गेले पाहिजे.
इथला जमिनदार वर्ग असो की शेतकरी वर्ग किंवा गर्भश्रीमंत असो या सगळ्यात समानता टिकून राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. नाहीतर यापुढे देखील मुठभर लोकांच्या हाती ही आर्थिक सत्ता एकवटून राहील आणि तीचे स्वरूप बदलावे यासाठी जनमानसात तीची व्यापकता दाखवून देवुन त्यात सामान वाटा कसा मिळेल याची प्रचिती आणुन द्यावी लागेल. आज राज्याचा शहरी भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रातील खेडोपाडी असंख्य कुटूंबाचा उदरनिर्वाह हा शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर च होतो. त्यातील ही असंख्य समाज हा 'हातावर पोट' घेऊन जगणारा आहे अशावेळी या समाजापर्यंत ज्या काही प्राथमिक सुखसुविधा आहेत त्या पोहोचवणे गरजेचे आहे. खेड्यापाड्यांचा सुधार करायचा असल्यास दळणवळण सुविधा फायदेशीर ठरते. दळणवळण सुविधा जेवढी उत्तम असेल तेवढी आर्थिक बाजु प्रगल्भ होईल.
राज्याच्या प्रगतीत महत्त्वाचा वाटा असतो तो तीथल्या राजकीय परिस्थितीचा. आज 'राजकारण आणि भ्रष्टाचार' हे जणु समिकरण च बनलंय पण त्यातही जर प्रामाणिक राज्यकर्ते असतील तर राज्याला उंच शिखरावर पोहोचवतील. राजकीय पुढारी असतील किंवा प्रशासकीय नोकरवर्ग आहे आणि अधिकारी वर्ग असो यांचा राज्याच्या जडणघडणीत मोठा वाटा असतो. शासनाने राबवलेल्या योजना असोत किंवा विकासात्मक प्रकल्प असोत या सगळ्या बाबी कणखरपणे संभाळण्याची क्षमता प्रशासकीय नोकरवर्गात असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत ते विधानभवन हा जो काही राजकीय साचा आहे त्यात समन्वय साधने वेळोवेळी गरजेचे आहे. खेडोपाडी गावपातळीवर काम करणारी ग्रामपंचायत असो की उच्च स्तरावर निर्णय घेणारे विधानभवन असो हे सगळे घटक राज्याच्या विकासाला तारक ठरतात त्यामुळे त्यामध्ये वावरणारे पुढारी असोत किंवा काम करणारा नोकरवर्ग असो यांच्यामध्ये राज्याविषयी प्रेम असावे आणि प्रामाणिक काम करण्याची क्षमता असावी. सुशिक्षित आणि प्रामाणिक वर्गाने राजकारणाकडे वळले पाहिजे त्यात मुख्य करुन तरुणांचा सहभाग हा मोठ्या संख्येने असायला हवा. पण राजकारण म्हणजे त्यासाठी आर्थिक स्थिती पण तेवढीच मजबूत असायला हवी हा इथल्या सुशिक्षित वर्गाचा समज झालेला आहे त्यामुळे यापासून हा सुशिक्षित वर्ग चार हात लांब राहतो. आणि या गोष्टी विचारात घेता जशी इथली आर्थिक सुबत्ता मुठभर लोकांच्या हाती एकवटलेली बघायला मिळते त्याचप्रमाणे हेच मुठभर श्रीमंत असणारे लोक राजकीय पुढारी म्हणून पुढे येतात. यामुळे उर्वरित वर्ग या सगळ्यापासुन अलिप्त राहतो. या राजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने सुशिक्षित, होतकरू आणि प्रामाणिक तरुणांना यात संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
राज्याच्या भोतिक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करता सर्वबाजुनी सर्वगुणसंपन्न असा आपल्या निदर्शनास येतो. महाराष्ट्राला लाभलेली समुद्र किनारपट्टी असो की इथलं हवामान शिवाय मुंबई सारखे औद्योगिक क्रांतीचे असणारे ठिकाण याचा विचार करता आज देशातील सर्वच राज्यातून महाराष्ट्राचं स्थान अव्वल आहे हो कोणीही अगदी डोळेझाकपणे सांगु शकतो. पर्यटन व्यवसाय महाराष्ट्रात अजून झळाळी घेऊ शकतो, पर्यावरण मंत्र्यांनी यासंदर्भात विचार करुन ठोस पावले उचलून पर्यटन विकासाला चालना देणे आवश्यक आहे. त्यातून रोजगार निर्मिती होईल शिवाय देशांतर्गत शिवाय देशाबाहेरील पर्यटक सुद्धा महाराष्ट्रात येतील आणि महुसलास मोठ्या प्रमाणात हातभार लागेल.
कवी 'गोविंदाग्रज' यांच्या, महाराष्ट्राचे अचूक वर्णन करताना एका गीतातील काही ओळींचा आवर्जून उल्लेख करावा लागतो कारण या ओळी या महाराष्ट्राचे अचूक वर्णन करतात.
राकट देशा, कणखर देशा,दगडांच्या देशा |
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्या ही देशा |
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा |
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा |
भावभक्तीच्यादेशा आणिक बुद्धीच्या देशा |
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा|
देशासमोरच नव्हे तर जगासमोर एक आदर्श म्हणून उभे राहण्याची क्षमता आज महाराष्ट्रामध्ये आहे. पण यासाठी वेगवेगळ्या संकल्पना उभ्या करून एक उत्तम असा या राज्याचा साचा तयार करणे आवश्यक आहे. या राज्याला 'पोखरणारी कीड' आहे ती नष्ट करणे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. राज्यात घडणाऱ्या ज्या काही राज्याला पिछाडीवर नेणाऱ्या बलात्कार, खुन, चोऱ्या, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, यासारख्या गोष्टी आहेत यावर जर मात केली तर तर हा बलशाली महाराष्ट्र जगासमोर एक आदर्श राज्य म्हणून गणले जाईल. राज्यातील जातीधर्मावर प्रहार करुन एकमेव 'महाराष्ट्र धर्म' या जनमाणसांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे. आज महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रात मागे नसला तरी तो या सर्वच क्षेत्रात कसा पुढे जाईल यासाठी सर्व स्तरातुन प्रयत्न केले गेले पाहीजेत. जसं आपण अभिमानाने म्हणतो की हा शिवराय, फुले, शाहु, आंबेडरांचा महाराष्ट्र आहे त्याचप्रमाणे त्यांचे विचार त्यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांती इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर सुवर्णाक्षरांनी कोरायला हवी. आजचा युवक हाच या महाष्ट्राचा कणखर कणा आहे आणि त्याला घडवला तर महाराष्ट्र आपोआप घडेल. कारण आमचा युवक आज व्यसनाच्या आहारी गेलाय, त्याची वासनांधता बळावताना दिसते. या सगळ्यातुन मार्ग काढून योग्य दिशेने मार्गक्रमण करत या युवकांच्या हातात महाराष्ट्राच्या भविष्याची आणि विकासाची धगधगती मशाल देवुन उंच शिखरावर नेण्यासाठी आव्हान करावे, आमचा हा आव्हाने पेलणारा युवक यात नक्कीच यशस्वी होईल. हा युवक गुन्हेगारी प्रवृत्तीतुन बाहेर पडेल यासाठी त्याचे मस्तक सशक्त करायला हवे. इथल्या प्रत्येकाला बाहेरच्या एकविसाव्या जगाची तोंडओळख करुन द्यायला हवी. आणि जागाच्या नकाशात आपली ओळख तयार करण्याची क्षमता प्रत्येकात निर्माण करायला हवी. आज महाराष्ट्र कोणत्याही क्षेत्रात इतर राज्यांच्या तुलनेत पुढे असल्याचे पहायला मिळते. महाराष्ट्राची लोककला असो संगीतकला असो किंवा अभिनय क्षेत्र असो आज महाराष्ट्राची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आज देशात अव्वल स्थानी असलो तरी अजूनही ज्या गोष्टी महाराष्ट्रातील एकुणच परिस्थिती साठी घातक आहेत अशा सर्व गोष्टिंचा नायनाट करावा लागेल. इथल्या सर्वसामान्य घटकांना हे रा ज्या आपलं वाटले पाहिजे. इथला नोकरवर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, स्त्री वर्ग असेल या सर्वांना योग्य न्याय मिळावा व त्यांना अभिमानाने जगता आले पाहिजे आणि हे सर्व करण्याची क्षमता आपल्या राज्य सरकार मध्ये आहे. या महाराष्ट्राला अजूनही उंच शिखरावर न्यायचे असेल तर इथल्या खेड्यांचा विकास हा झालाच पाहिजे. ही ओस पडलेली खेडी पुन्हा नव्याने उभी राहिली पाहीजेत. महाराष्ट्राच्या एकुणच भौगोलिक परिस्थिती चा विचार करता परराज्यातील अनेक लोक उद्योगधंद्यांसाठी पोटापाण्यासाठी महाराष्ट्रातील शहरी भागात स्थलांतर करतात परंतु आज इथल्या शहरांची सामावून घेण्याची क्षमता देखील संपलेली आहे. हा परराज्यातील लोंढा थांबवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. हा महाराष्ट्र नवीन क्रातीकारी स्वरूपात घडवायचा असेल तर इथे शैक्षणिक आणि समाजिक क्रांती घडलीच पाहिजे आणि त्यापाठोपाठ इथल्या आपल्या सगळ्यांचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव यांसाठी आधुनिक शेतीची संकल्पना मांडुन आधुनिक शेतीसाठी चालना दिली गेली पाहिजे. महाराष्ट्रासाठी लोकसंख्या वाढ आणि स्त्री पुरुष प्रमाण या दोन गोष्टी महाराष्ट्राच्या भविष्याची धोक्याची घटना मानली जाते आणि यावर उपाय योजना करुन दोन्ही गोष्टींचा शक्य तितक्या लवकर मिटवाव्या लागतील. लोकसंख्या वाढि विरोधक लोकांना जागरूक करणे, प्रबोधन करणे तर त्याचप्रमाणे मुलीच्या संख्येत वाढ होण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजना असोत किंवा सुरक्षितता असो याची हमी देणे काळाची गरज आहे.
एकुणच महाराष्ट्राच्या सर्वांगीण बाबींचा विचार करता सध्यस्थिती जरी वाखाणण्याजोगी असली तयी अजून या राज्याला उच्चतेच्या शिखरावर जाण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, आणि शेतीविषयक बाबींचा विचार करुन पुरेपूर या सगळ्यासाठी चालना देवुन अजूनही एक वेगळा आदर्शवत महाराष्ट्र घडवण्याचे पुण्यकर्म आपल्या सगळ्यांच्या हातुन घडणे आवश्यक आहे. इथल्या अठरापगड जातींना घेऊन, सर्वांमध्ये समानता आणणे आवश्यक आहे. आजही मागास आणि खितपत पडलेल्या सामाजिक दुर्बल घटकांना संधी देवुन त्यांना न्याय द्यायचं काम हे आपल्या सरकारने केले पाहिजे. हा महाराष्ट्र माझा आहे आणि तो सर्वोतोपरी घडवण्याचे काम माझे आहे असे प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि यासाठी फक्त आणि फक्त ही निर्माण होत चाललेली विषमतेची दरी मिटवायला हवी. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवून एक आधुनिक महाराष्ट्र या देशाला च नव्हे तर जगाला पाहाता आला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, पाणी या जा काही महत्वाच्या आणि प्राथमिक गरजा आहेत त्या प्रत्येक नागरीकाच्या पुर्ण व्हायला हव्यात तर आपल्या सर्वांच्या स्वप्नातील नवा महाराष्ट्र आपण लवकरच घडवु. शेवटी प्रत्येकाच्या तोंडुन या दोन ओळी आपसूकच बाहेर यायला हव्या आणि त्या म्हणजे,
बहु असोत सुंदर, संपन्न की महा |
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा |
भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे एकुणच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थान हे अव्वल राहीलेले आहे आणि आणि ते यापुढेही राहील यात शंका नाही. म्हणूनच आपण 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा' असे अभिमानाने नेहमी म्हणतो.
बहु असोत सुंदर संपन्न कि महा| प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा|
जय हिंद | जय महाराष्ट्र | जय भारत|
श्री. निळकंठ शांताराम तांबे,
(बी.ए.डी.एड)
शिवकृपा चाल नं.२, रुम नं.६
गणेश मैदान,
तानाजी नगर, कुरार विलेज,
शिवसेना शाखा नं. ३४ जवळ,
मालाड पुर्व
मुंबई ९७
No comments:
Post a Comment