_*प्रबोधन*_ ही काळाची गरज......!!!!
'किर्तनाने माणूस सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही' असं कोणीही, कितीही ओरडून सांगितलं तरी 'प्रबोधन' ही एक मात्र अशी गोष्ट आहे ज्याने समाज सुधारू शकतो हे तितकंच खरं आहे. खरंतर हे आवर्जून लिहिण्यामागचं कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेलं 'कॅप्टन खरात' प्रकरण.....
'बुवा तिथे बाया' असे गमतीने जरी म्हटलं असलं तरी त्याची पातळी किती घसरते आणि ती किती खालच्या थराला पोहोचते हे यावरून प्रखरपणे दिसून आलं. या महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांने इतके बळी गेले आहेत, इतके अत्याचार केले गेले आहेत की, आपल्याला मोजता येणार नाही. पण आजही परिस्थिती 'जैसे थे' अशीच आहे.
महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले मग ते संत गाडगेबाबा असतील प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा मग नरेंद्र दाभोळकर असतील अशा अनेक लोकांनी अंधश्रद्धेवर टीका केली आणि समाज प्रबोधन केले. पण काही समाजकंटकानी त्यांच्या या विचारांना धर्म विरोधी म्हणून ठरवून टाकलं पण आज परिस्थिती पाहता हे विचार जनमानसात कायमस्वरूपी रुजवत राहायला पाहिजे हे प्रकर्षाने जाणवतं. आज महाराष्ट्रात 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' असेल 'संभाजी ब्रिगेड' असेल 'कुणबी युवा मुंबई' असेल अशा अनेक संघटना प्रबोधनाचं काम करत आहेत आणि ते काम अविरतपणे चालू आहे शिवाय ही काळाची गरज आहे.
या देशात या राज्यात अनेक समाजसेवक मोठ- मोठे नेते होऊन गेले त्यानी केलेली कामे, त्यांनी केलेली समाजसेवा ही जशी आपल्याला दिसुन येते तसेच ज्या ज्या समाजसुधारकांनी आपले प्रबोधनात्मक विचार या महाराष्ट्राच्या मातीत रुजवले आहेत ते विचार आजही सुशिक्षित लोक स्वतः वाचुन जनमानसात पेरण्याचे काम करतात. संत तुकारामांचे अभंग असतील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले वैचारिक प्रहार असतील, संत गाडगेबाबांचे कीर्तन रुपी विचार असतील, पेरीयार रामासामी यांनी उभी केलेली प्रबोधनाची चळवळ असेल, प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या पुस्तकातून लिहून ठेवलेले विचार असतील किंवा नरेंद्र दाभोळकरांनी त्यांचे विचार पुस्तकाच्या रुपाने जे लिहुन ठेवलेले आहेत हे विचार आहेत त्या विचारांची कायम गरज या समाजाला आहे आणि हे विचार सुशिक्षित वर्गाने वाचले पाहिजेत.....
या महाराष्ट्रात बुवाबाजीचं जे काही स्तोम माजलेलं आहे ते थांबवायचं असेल, या महाराष्ट्रातील अंधश्रद्धा आणि कर्मकांड थांबवायचे असतील तर त्या सगळ्या वरचा 'प्रबोधन' हा एकमेव जालीम उपाय आहे हे मान्य करायलाच हवं तरच या महाराष्ट्रातील जी काही स्त्रियांची अब्रूची लक्तरे काढली जात आहेत किंवा कर्मकांडातून स्त्रियांवरील अत्याचार होत आहेत, लोकांचे जे हकनाक बळी जात आहेत त्यावर कुठेतरी नक्कीच आळा बसेल......... 🙏🏻
निळकंठ तांबे
No comments:
Post a Comment